मिळून सारे,बदलूया शिक्षणव्यवस्था



२००९चा शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून शिक्षण क्षेत्राचे स्वरूप झपाटय़ाने बदलत आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत केवळ भौतिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता, शिक्षकांची उदासीनता आणि वेतन इत्यादीचा विचार होत होता. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या जोशात साक्षरता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत असे आपण समजू लागलो. २००९चा शिक्षण हक्क कायदा ६ ते १४ वयातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क देतोच, पण कलम ७ आणि कलम ८ खाली हे शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे असा कायदेशीर हक्क पण बालकांना देतो. ही शिक्षण क्षेत्रातील मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. 
आनंददायी जीवन शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात ज्ञान संरचनावाद ही संकल्पनापण नव्यानेच मांडली आहे. आराखडय़ात प्रतिपादन केलेली ज्ञान संरचनावाद ही पाश्चात्त्य कल्पना आहे म्हणून तिची हेटाळणी आज काही शिक्षणतज्ज्ञ करीत आहेत. खरी तशी परिस्थिती नाही आहे. प्राचीन काळातील गुरुकुल पद्धत ही ज्ञान संरचनावादाचे आदर्श उदाहरण म्हणून समजता येईल. इंग्रजांनी सुरू केलेल्या पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीला आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी राष्ट्रीय शाळा सुरू करून ज्ञान संरचनावादाचा मार्ग स्वीकारला होता. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात पुरस्कृत केलेली सूतकताई हेही जीवन कौशल्याचा भाग होते. मधल्या काळात विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करताना सोयीचे म्हणून वर्तनवादी शिक्षण पद्धती स्वीकारली गेली. अर्थात या काळातसुद्धा काही संस्था, व्यक्ती ज्ञान रचनावादाचा प्रयोग करीतच होते. परंतु सर्व साधारणपणे वर्तनवादी पद्धत आपल्या शिक्षणपद्धतीत रुळली होती. परंतु झपाटय़ाने बदलणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व आíथक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही जुनी शिक्षणपद्धत अपुरी ठरत आहे. 
पाश्चात्त्य तज्ज्ञांनी शास्त्रोक्त पद्धतीने नव्याने मांडलेली ज्ञान रचनावाद ही आधुनिक संकल्पना आहे, असे म्हणावयास हरकत नाही. मानवी मेंदूवर केलेल्या शास्त्रोक्त अभ्यासाला सामाजिक व आनुवंशिक शास्त्राची जोड देऊन ही पद्धत मांडली गेली आहे. 
शैक्षणिक आराखडय़ात ज्ञान संरचनावाद संदर्भी खालील तत्त्वे नमूद केली आहेत - 
ज्ञान हे स्थितिशील (Static) नसून गतिशील (dynamic) आहे. 
पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानसंरचना करतात. 
सामाजिक, भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रिया (interaction) हा माहितीचा स्रोत असतो व याद्वारे ज्ञानाची निर्मिती होते. 
स्थानिक परिसराचा / परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंरचनेत महत्त्वाचा वाटा असतो. 
राष्ट्रीय शालेय आराखडय़ात शिक्षकांचे महत्त्व जाणले आहे. प्रा. यश पाल आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, शिक्षकांची भूमिका ही फार मोलाची आहे आणि ती अधिक सक्षम केली पाहिजे यानुसार संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ात शिक्षक सक्षमीकरणावर भर दिला आहे. बदलत्या शैक्षणिक पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका आणि त्याचबरोबर अध्यापनाची पद्धतसुद्धा बदललेली आहे. जुन्या पंतोजीची भूमिका सोडून शिक्षकांना मार्गदर्शकाची भूमिका दिली आहे. जुनी जाडी पाठय़पुस्तके मागे पडून, छोटी सुटसुटीत पाठय़पुस्तके, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रकाशित केली आहेत. या पाठय़पुस्तकात धडय़ाखाली दिलेल्या टिपा, प्रकल्प, स्वाध्याय अभ्यासपूर्ण आहेत हे सर्व सोडविण्यास शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, ही अपेक्षा आहे. Learning Through learning आणि learning through doing या दोन्ही संकल्पना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यास प्रवृत्त केले पाहिजे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ